मुंबई : संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरीता कंत्राटदारांकडून वाहने आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला असून त्याला सफाई कामगारांच्या संघटनानी विरोध केला आहे. गेला महिनाभर निदर्शने, आंदोलने झाल्यानंतर आता कामगार संघर्ष समिती संप करण्याच्या विचारात आहे. संप करावा की करू नये हे ठरवण्यासाठी घनकचरा विभागातील कामगारांचे मंगळवारी मतदान घेण्यात आले. बुधवारी संध्याकाळपर्यंत पार पडलेल्या मतमोजणीत ९७ टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. कामगारांनी दिलेल्या मतदानाचा विचार करून गुरुवार, १७ जुलै रोजी संपाबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.

संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरीता मुंबई महापालिकेने सेवा आधारित नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मोटर लोडर पदावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना रस्त्यांची झाडलोट करण्याचे काम दुसऱ्या पाळीत दिले जाणार आहे. मात्र हा निर्णय म्हणजे महापालिकेच्या सफाई खात्यातील कामाचे १०० टक्के खाजगीकरण असल्याचा आरोप कामगार संघटनानी केला आहे. त्याविरोधात आजपर्यंत संबंधित कामगार संघटनांनी मेळावे, मोर्चे, निदर्शने करून निषेध केला. तसेच निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु महापालिका प्रशासनाने निविदा रद्द केली नाही. या योजनेला कामगार संघटनांचा विरोध असून सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे.

संघर्ष समितीने यासंदर्भात संबंधित कामगारांचा कल समजून घेऊन प्रत्यक्ष निर्णय घ्यावा असा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्याच्या सर्व चौक्यांवर तसेच परिवहन खात्यातील यानगृहांमध्ये पालिकेच्या या निर्णयाविरोधात ‘संप करावा की करू नये’ यासाठी मंगळवारी १५ जुलै रोजी मतदान आयोजित केले होते. त्याची मतमोजणी बुधवार, १६ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू झाली होती. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या लोअर परळ येथील कार्यालयात मतमोजणी पार पडली. बाळ दंडवते स्मृती, बावला मस्जिद समोर, ना. म. जोशी मार्ग येथे पार पडलेल्या मतमोजणीत संध्याकाळपर्यंत शहर भागातील मतमोजणी पार पडली. त्यात ९७ टक्के कामगारांनी संपाच्या बाजून कौल दिल्याची माहिती कामगार नेते रमाकांत बने यांनी दिली.

संप अटळ असल्याची चर्चा

संपाच्या बाजूने निर्णय झाल्यास मुंबईतील कचरा संकलनाच्या कामावर त्याचा परिणाम होणार आहे. या प्रश्नी पालिका प्रशासन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यावर ठाम असून तसेच झाल्यास संपही अटळ असेल अशी कामगार संघटनांमध्ये चर्चा आहे. दरम्यान, कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिल्यामुळे आता कामगार संघटनांना संपाचे हत्यार उपसावे लागणार आहे. परंतु, त्यातून येत्या काळात प्रश्न चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृती समिती जाहीर करणार निर्णय

संपाबाबतचा निर्णय जाहीर करण्यासाठी संघर्ष समितीने कृती समिती तयार केली आहे. माजी आमदार कपिल पाटील, कामगार नेते सुरेश ठाकूर आणि कॉ. विजय कुलकर्णी यांच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली १७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे सफाई कामगार जमणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यास त्यानंतर बेमुदत संपाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कामगार सेनेचे संजय बापेरकर यांनी दिली.

किती मते संपाच्या बाजूने

शहर भागातील एकूण ८,८५० सफाई कामगार व तथाकथित कंत्राटी कामगारांनी मतदान केले असून त्यापैकी ८,६६५ (९७ टक्के) कामगारांनी संप करावा या बाजूने कौल दिला आहे. तसेच ९३ कामगारांनी संप करण्यास विरोध दर्शवला असून ९२ मते अवैध ठरली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पार्श्वभूमी काय

मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. घरोघरी गोळा केलेला कचरा जमा करण्यासाठी सेवाधारित कंत्राट देण्याचे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने ठरवले आहे. आतापर्यंत कचरा गोळा करण्यासाठी काही ठिकाणी महापालिकेची वाहने व महापालिकेचे कामगार होते. तर काही ठिकाणी कंत्राटदाराची वाहने आणि महापालिकेचे मोटर लोडर अशी पद्धत होती. ही पद्धत मोडीत काढून मुंबईतील २५ पैकी २२ विभागांमध्ये कंत्राटदाराची वाहने आणि त्यांचेच मनुष्यबळ असे सेवा आधारित कंत्राट देण्यात येणार आहे. या योजनेला कामगार संघटनांचा विरोध आहे. पालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेला १८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याच्या आधी कामगारांनी संप केल्यास कचरा उचलण्याचे काम ठप्प होऊ शकते.