मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी या महिन्याच्या अखेरीस आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या दोन अडीच वर्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांचे काय होणार याची आता चर्चा होऊ लागली आहे. उमेदवारीच्या आशेने आणि त्याच आश्वासनावर दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना या आरक्षणामुळे फटका बसणार की नशीब साथ देणार याबाबत उत्सुकता आहे.
जवळपास चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याकरीता प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे. प्रभागाच्या सीमांचा अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. आता सर्वच उमेदवारांना आरक्षण सोडत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. आरक्षण सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही.
मुंबई महापालिकेवर गेली सुमारे २५ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणूकीत शिवसेनेच्या दोन गटात अधिक चुरस असेल. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन अडीच वर्षात मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व माजी नगरसेवक अर्थातच उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
मतदारसंघ राखीव झाल्यास उमेदवारी मिळणार नाही या भीतीने केवळ आयारामांनाच नाही तर सगळ्याच उमेदवारांना ग्रासले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या प्रभागांमध्येही इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. आरक्षण कसे असेल हे सांगू शकत नाही. प्रभाग महिला राखीव झाला तर संधी हुकण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केलेल्यांना या आरक्षणाचा अधिक फटका बसेल अशी शक्यता काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. हे सर्व माजी नगरसेवक आपापल्या प्रभागात प्रस्थापित आहेत. त्यांनी निधी मिळवून प्रभागात कामे सुरू केली आहेत. पण मतदारसंघ आरक्षित झाल्यास त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. याचा फटका सर्वाधिक पुरुष उमेदवारांना बसणार आहे.
पत्नीला किंवा मुलीला उमेदवारी …
याबाबत काही माजी नगरसेवकांची मते जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की आरक्षणाची अनिश्चितता सगळ्यांनाच भेडसावत असते. एखादा प्रभाग महिला आरक्षित झाला की पत्नीला किंवा मुलीला उमेदवारी देऊन नगरसेवक पद आपल्याच कुटुंबात कसे राहील याची काळजी काही प्रस्थापित राजकारणी घेतात. पण जातीचे आरक्षण आले की मात्र मोठी अडचण होते. त्यातही मग खोटे जातप्रमाणपत्र लावून उमेदवारी पदरात पाडून घेणाऱ्यांची कमी नाही.
राजकीय आश्वासन
अनेक आयारामांना पक्षात घेताना उमेदवारीचे आश्वासन दिले जाते. पण हे आश्वासन राजकीय हेतूने असते ते ‘जंटलमन प्रॉमिस’ नाही याची सगळ्याच राजकारण्यांना कल्पना असते, अशीही प्रतिक्रिया एका माजी नगरसेवकांनी दिली. आपल्या प्रभागात आधी कोणते आरक्षण होते, पुढे कोणते आरक्षण पडू शकते याचा अभ्यास उमेदवारांनी केलेला असतो, असेही त्यांनी सांगितले.
१२३ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश ? गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्व पक्षातील मिळून तब्बल १२३ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असल्याचा दावा त्यांच्या पक्षातर्फे केला जातो आहे. त्यात ठाकरे यांच्या पक्षातील ७६ माजी नगरसेवक आहेत. यामध्ये २०१२, २०१७ या कालावधीतील नगरसेवकांचा समावेश आहे.
