मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, डायपर्स इत्यादींची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करणाऱ्या भट्टीद्वारे (इन्सिनरेटर) आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राद्वारे केली जाते.

महानगरपालिका क्षेत्रात घरगुती कचऱ्यामध्ये सॅनिटरी पॅड्स, डायपर्स असा सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलनासाठी यंत्रणेची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कचरा संकलनासाठी लागणाऱ्या पिवळ्या पिशव्या, पिवळे डबे यासोबतच कचरा वाहून नेणाऱ्या वाहनसंख्येतही वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ ही सेवा महापालिकेतर्फे एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याच्या संकलनासाठी सद्यस्थितीत प्रत्येक प्रशासकीय विभागात ०.६ टन क्षमतेचे स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. या वाहनाच्या माध्यमातून फक्त सॅनिटरी व विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे संकलन केले जाते. या कचऱ्याच्या संकलन क्षमतेत वाढ व्हावी, यादृष्टीने अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी महापालिकेकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध संबंधित संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. मुंबईतील १० इन्सिनरेटर प्रकल्पांचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वयंचलित पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबईत सुक्या कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यासाठी सद्यस्थितीला एकूण ४१ भट्टी (इन्सिनरेटर) कार्यरत आहेत. त्यातील १० ठिकाणांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये स्वयंचलित पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. स्वयंचलित कन्व्हेयर बेल्टचा वापर करून कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येईल.

तसेच कर्मचाऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने विविध सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणारे इन्सिनरेटर अत्याधुनिक पद्धतीने चालविण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. इन्सिनरेटरची संख्या वाढविण्याचेही विचाराधीन आहे, असेही त्यांनी नमूद केले.

४ हजारांहून अधिक संस्थांची नोंदणी

मागील दोन महिन्यांच्या कालावधीत क्यूआर कोड स्वयंनोंदणी प्रणालीचा वापर करून ४ हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक नोंदणी करून सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन करण्यासाठी मुंबईकरांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. नागरिक आणि संस्थांना क्यूआर कोड स्वयंनोंदणी प्रणालीद्वारे नोंद करता येणार आहे.

मुंबईत सॅनिटरी कचरा संकलनासाठी जनजागृती करण्यासाठी निसर्ग या संस्थेच्या माध्यमातून विविध पातळीवर जनजागृती आणि संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.