मुंबई : मुंबई महापालिकेने नाहूर येथे पक्षी उद्यान तयार करण्याचे ठरवले असून त्याकरीता नुकत्याच निविदा मागवल्या आहेत. मात्र निविदा प्रक्रिया सुरू झालेली असतानाच या प्रकल्पाबाबत वाद सुरू झाला आहे. या प्रकल्पाची किंमत ६६ कोटीनी वाढली असल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा मागवल्या. मुलुंडच्या या नियोजित उद्यानात १८ दुर्मिळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या कामासाठी १६६ कोटींचा खर्च अंदाजित आहे. मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या असून त्यावर वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर केवळ चार महिन्यांच्या कालावधीत प्रकल्पाचा मूळ अंदाजित रु.१०० कोटींपासून थेट १६६ कोटींवर गेला आहे. अंदाजित रकमेतील ही वाढ अनाकलनीय असून जनतेच्या पैशांची प्रचंड उधळपट्टी आहे असा आरोप संस्थेचे निकोलस अल्मेडा आणि पिमेंटा गॉडफ्रे यांनी केला आहे.
या प्रकरणी पिमेंटा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केलेली आहे. तसेच निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पाचा खर्च खरोखरच वाढला आहे की यामध्ये कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे आहे का असाही सवाल गॉडफ्रे यांनी उपस्थित केला आहे.
या खर्चवाढीमागील कारणांची व वैधतेची सखोल चौकशी भ्रष्टाचारविरोधी विभाग तसेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडून करण्यात यावी. सद्याची निविदा त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने केली आहे.
प्रशासनाने आरोप फेटाळले….
प्रकल्पाचा अंदाजित खर्च महापालिका प्रशासनाने कधीच जाहीर केला नव्हता. ढोबळ खर्च ८० ते ९० कोटी होता. पण नंतर सविस्तर आराखडा तयार केल्यानंतर त्यात १०० गाड्यांसाठी भूमिगत वाहनतळाची सुविधा व पुढील २ वर्षे संपूर्ण व्यवस्थापन खर्च जोडला गेला. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च साधारण १६५ कोटींवर गेला आहे, अशी प्रतिक्रिया जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
नाहूर गाव परिसरात १७,९५८ चौरस मीटर भूखंडावर हे पक्षी उद्यान उभारले जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षाचा अवधी लागणार आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.