मुंबई : मुंबईची सव्वा कोटींची लोकसंख्या विचारात घेता मुंबईत दरवर्षी मोठ्या संख्येने विवाह होत असले तरी वार्षिक केवळ ३० ते ३५ हजार विवाहांचीच मुंबई महापालिकेकडे नोंदणी होत असते. नोंदणी करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींमुळे हा दर अतिशय कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने विवाह नोंदणी जलद होण्यासाठी खास सुविधा तयार केल्या असून त्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. या सुविधेअंतर्गत त्याच दिवशी विवाह प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दांम्पत्यासाठी अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी ते आवश्यक असते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागांर्तगत ही विवाह नोंदणी होत असते. वर्षभरात मुंबईत जेवढे विवाह होतात. त्याच्या तुलनेत विवाह नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. याची कारणे मुंबई महापालिकेने शोधली असता मुंबईकरांना वेळेअभावी नोंदणी करणे गैरसोयीचे जाते. त्यामुळे या अडचणी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नवीन उपक्रम सुरू केला आहे.
मुंबई महापालिकेत केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या असून या सेवा २१ सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत.
क्यू आर कोड आणि डिजी लॉकर …..
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ‘विवाह नोंदणी सेवा’ अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस सुरु राहणार आहे. तसेच, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) २० टक्के विवाह नोंदणी सेवा ही ‘फास्टट्रॅक’ म्हणून राखीव राहणार आहे. या सेवा अंतर्गत मिळणारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र क्यूआर कोडसह उपलब्ध होणार आहे. लवकरच डिजिलॉकर सुविधेतही या विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा समावेश होणार आहे.
विवाह नोंदणी ऑनलाईनही
शनिवारी व रविवारी विवाह नोंदणी इच्छुकांना करण्यासाठी वेळ प्राप्त करण्यासाठी (Appointment), ऑनलाइन अर्ज हा Appointment दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत करता येईल. जलद विवाह नोंदणीचे अर्ज त्याच दिवशी प्रक्रियेसाठी ऑनलाइन सादर करता येतील. त्याकरीता मुंबई महापालिकेने https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlmarriagetab?guest_user=english ही लिंक दिली आहे.
अडीच हजाराचे अतिरिक्त शुल्क
साप्ताहिक सुटीतील आणि जलद विवाह नोंदणी सेवांसाठी नियमित शुल्क अधिक रुपये २,५००/- इतके अतिरिक्त शुल्क लागू असेल. हे शुल्क महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरता येणार आहे.
धार्मिक कक्षा रुंदावल्या ….
विवाहाचे ठिकाण जर महाराष्ट्रातील असेल, तरच महानगरपालिकेकडे विवाह नोंदणी करता येत होती. परंतु, ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी विवाह झालेले जोडपे यांच्यापैकी कोणीही एक व्यक्ती मुंबईत ज्या विभागात राहत असेल, त्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात विवाह नोंदणी करू शकतात. तसेच याआधी, महानगरपालिकेच्या कार्यालयात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, जैन धर्मीय या जोडप्यांची विवाह नोंदणी करण्यात येत होती.
आता, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी यांसारख्या सर्व धर्मांच्या समान धर्मीय जोडप्यांनाही विवाह नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. शीख जोडप्यांसाठी वरील पर्याया व्यतिरिक्त, आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत नोंदणी अर्जाकरिता, आता महानगरपालिका संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.