मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा उद्यान मार्गावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) विकासकाने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता पुनर्वसन प्रकल्पस्थळी साचणारे पावसाचे पाणी उपसा यंत्रणेच्या माध्यमातून (मोटर पंप) उपसून थेट रस्त्यावर सोडले. त्यामुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे. याची गंभीर दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विकासकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर ओशिवरा उद्यान आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रस्तावित असून ऑक्टोबर २०२५ मध्ये ते सुरू होईल. दरम्यान, या रस्त्यावर खड्डे पडले असून २ ऑगस्ट, २३ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने खड्डे बुजवले. मात्र मागील तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे व प्रकल्पस्थळी येणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी २२ सप्टेंबर रोजी खड्डे बुजविण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.

रस्ते दुरूस्ती सुरू असताना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) विकासकाने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे आढळले. तसेच पुनर्वसन प्रकल्पस्थळावरून पावसाचे पाणी मोटर पंपाने उपसून थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रस्ता दुरवस्थेस कारणीभूत असल्याकारणाने संबंधित ‘एसआरए’ विकासकाविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मेसर्स चांदिवाला डेव्हलपर्स असे गुन्हा दाखल झालेल्या विकासकाचे नाव आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ११५ (क) आणि ११७ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.