मुंबई : सफाई आणि परिवहन खात्यातील कंत्राटीकरणाविरोधात स्वच्छता कामगारांनी यशस्वी लढा दिला. मात्र, त्यानंतरही स्वच्छता कामगारांचे काही प्रश्न मार्गी लागलेली नाहीत. महापालिकेतील स्वच्छता कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सेक्युलर मुव्हमेंट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. स्वच्छता कामगारांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांचे जीवनमान सुधारावे, यादृष्टीने विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. स्वच्छता कामगारांना वाढीव वेतन, त्यांच्या मुलांना रोजगार, घरे आदिंसंदर्भात मागण्या करण्यात आले.
मुंबई महापालिकेतील स्वच्छता कामगार स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहराची साफसफाई करतात. अस्वच्छता व घाणीमुळे होणाऱ्या गंभीर रोगांच्या प्रादुर्भावला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्यांना मिळणारे वेतन व सोयी सुविधा अत्यंत कमी असल्याने त्यांना निकृष्ट दर्जाचे जीवन जगावे लागत आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे त्यांच्या कुटुंबाच्या राहणीमानावर तसेच मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याने स्वच्छता कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.
त्यामुळे महानगरपालिकेतील सफाई व स्वच्छता कामगारांना सरकारी डॉक्टरांपेक्षा किमान एक रुपया वाढीव वेतन देण्यात यावे, स्वच्छता कामगारांच्या मुलांना अनुकंपा तत्वावर स्वच्छता कामगार म्हणूनच घ्यावे, महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्याच्या धोरणात सुधारणा करून त्यांच्या मुलांना किंवा वारसांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अन्य पदांवर नियुक्तया देण्यात याव्यात, स्वच्छता कामगारांना राहण्यासाठी चांगली घरे, तसेच कामासाठी आधुनिक यंत्रे, उपकारणे देण्यात यावीत, दर तीन वर्षांनी स्वच्छता कामगारांची आणि महापालिकेची विविध कार्यालये व आस्थापनेतील त्याच श्रेणीतील कामगारांच्या सेवांची अदलाबदली करण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या.
त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे, कार्याध्यक्ष व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, सूर्यकांत शेळके, नीलध्वज दाभाडे आदी उपस्थित होते.
दुर्लक्षित, उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्याची ओढ
सेक्युलर मुव्हमेंट ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहे. विशेषतः शिक्षण आणि प्रशासनात शिरकाव करीत असलेल्या धार्मिकतेला संविधानिक मार्गाने अटकाव करण्याचा ही संघटना प्रबोधन व प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. त्याच बरोबर, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकाचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी सेक्युलर मुव्हमेंट संघटना शासनाकडे आग्रह धरीत आहे.