मुंबई : प्रसिध्द बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरच्या आईच्या चालकाने फरहानच्या कार्डाचा गैरवापर करून तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केली. चालक नरेंद्र सिंग गाडीत पेट्रोल न भरता पैसे लंपास करीत होता. याप्रकरणी चालक सिंग आणि वांद्रे येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता फरहान अख्तर (५१) याची आई हनी इराणी (७५) या वांद्रे पश्चिम येथे राहतात. त्यांच्याकडे दोन चालक काम करतात. त्यापैकी एक चालक नरेश सिंगकडे (३५) वाहनात पेट्रोल भरण्यासाठी फरहानचे डेबीट कार्ड देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तो गाडीत इंधन न भरता कार्ड स्वाइप करायचा. नंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरुण सिंग (५२) त्याला रोख रक्कम देत होता. त्यातून स्वतःसाठी काही हिस्सा ठेवत होता. दोघांचे संगनमत असल्याने राजरोस ही चोरी सुरू होती.
व्यवस्थापिकेला आढळला घोटाळा
हनी इराणी यांच्या व्यवस्थापक दिव्या भाटिया (३६) गाड्यांच्या पेट्रोल-डिझेल खर्चाचे खाते तपासत असताना हिशोबात विसंगती आढळली. मारुती मोटारगाडीच्या डिझेल टाकीची क्षमता ३५ लिटर असताना त्यात ६२ लिटर डिझेल भरल्याची नोंद होती. याबाबत भाटिया यांनी चालक नरेश सिंगला विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. फक्त आपल्याकडे इंधन भरण्यासाठी कार्ड असल्याचे त्याने सांगितले. तपासणीमध्ये चोरी पकडली त्यामुळे भाटिया यांनी पेट्रोल-डिझेल कार्डांचा संपूर्ण तपशील तपासले. सिंगने फरहान अख्तर याच्या नावावर असलेली तीन कार्डे वापरली होती. याशिवाय त्याने सात वर्षांपूर्वी विकलेल्या मोटारगाडीसाठीही इंधन खरेदी केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर भाटिया यांनी याबाबत फरहान अख्तरची आई हनी इराणी यांना हा प्रकार सांगितला.
२०२२ पासून सुरू होती चोरी
चालक नरेंद्र सिंग २०२२ मध्ये कामावर रुजू झाला होता. त्याला फरहान अख्तरचा माजी चालक संतोष कुमारने फरहान अख्तरच्या नावावरील बॅंकांची तीन डेबीट कार्ड दिली होती. ही कार्डे घेऊन सिंग नेहमी एस. व्ही. रोडवरील वांद्रे तलावाजवळील पेट्रोल पंपावरच पेट्रोल-डिझेल भरत होता. तेथील कर्मचारी अमर सिंग याच्या संगनमताने त्याने शक्कल लढवली. सिंग पेट्रोल न भरता कार्ड स्वाइप करीत होता. नंतर अमर सिंगला तेवढी रक्कम रोखीने देत होता. दरवेळी त्यापैकी १००० ते १५०० रुपये स्वत:साठी ठेवत होता. अशाप्रकारे या दोघांनी आतापर्यंत सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल
हनी इराणी यांच्या व्यवस्ताफक दिव्या भाटिया यांनी नरेश सिंग आणि अमर सिंग यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (विश्वासघात), ४१८ (फसवणूक) आणि ३(५) (सामान्य कटाचा हेतू ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.