मुंबई : मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या आणि समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या अर्जावर भूमिका स्पष्ट करा, असे आदेश सत्र न्यायालयाने  राज्य सरकारला दिले.

ममता यांनी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडलेली नाहीत. त्यामुळे त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्यावर कारवाईसाठी मंजुरीची आवश्यकता नाही किंवा कारवाई करण्यात कोणताही अडथळा नाही, असे शिवडी महानगरदंडाधिकारम्यांनी नमूद करून ममता यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात ममता यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही ममता यांच्या अर्जाची दखल घेऊन शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. ममता यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असता या अर्जावर न्यायालयाने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कफ परेड पोलिसांना देण्याची मागणी भाजपचे मुंबई विभागाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांनी ममता यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्याचे आदेश देऊन त्यांना समन्स बजावले होते.