मुंबई : एखाद्या महिलेला तिच्या वर्णावरून आणि स्वयंपाकावरून टोमणे मारणे हा घरगुती भांडणाचा प्रकार आहे. त्यामुळे, या कारणास्तव महिलेने आत्महत्या केली, तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने २७ वर्षे जुन्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करताना दिला.
याचिककर्त्याने मृत पत्नीला तिच्या काळ्या वर्णावरून आणि सासऱ्याने स्वयंपाकाच्या गुणवत्तेवरून टोमणे मारल्याचे आरोप कौटुंबिक छळाचे असले तरी त्याला क्रौर्य किंवा आत्महत्येचे कारण म्हणता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय देताना नोंदवले. सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने ३१ जुलै १९९८ रोजी याचिककर्त्याला त्याच्यावरील दोन आरोपांत दोषी ठरवून अनुक्रमे एक वर्ष आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
याचिककर्ता सदाशिव रूपनवर याच्याशी लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेमा हिने जानेवारी १९९८ मध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. वर्ण आणि स्वयंपाक न जमणे हे कौटुंबिक छळाचे मूळ कारण असल्याचे प्रेमाने तिच्या नातेवाईकांना सांगितले होते. याचिककर्ता प्रेमाला वर्णावरून अनेकदा टोमणे मारत असे आणि दुसरे लग्न करण्याची धमकी देत असे, अशी प्रेमाच्या नातेवाईकांनी दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली.
परंतु, या सर्व कारणांचा विचार केला तर ते वैवाहिक जीवनातून उद्भवणाऱ्या भांडणाचा भाग आहे. ही कारणे प्रेमाला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासाठी कारणीभूत असल्याचे म्हणता येणार नाही. म्हणूनच, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (छळवणूक) आणि ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत हा गुन्हा होत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले.
तथापि, कनिष्ठ न्यायालयाने विचारात घेतलेल्या तीन साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांच्या अभ्यास केल्यानंतर ते छळाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणारे नव्हते. ही आत्महत्या होती हे मान्य आहे. परंतु, सरकारी वकिलांना छळ आणि आत्महत्येचा संबंध सिद्ध करता आलेला नाही. प्रेमाचा छळ झाला होता, परंतु, फौजदारी कायदा लागू करता येईल अशा प्रकारचा हा छळ नव्हता. त्यामुळे कायद्याचा विचार करता कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवता येणार नाही, असे अधोरेखीत करून न्यायालयाने सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि याचिककर्त्याची २७ वर्षांनी त्याच्यावरील आरोपांतून निर्दोष सुटका केली.