Bombay High Court on Mehul Choksi Plea देशातून पलायन केलेल्या आणि न्यायालयाने समन्स बजावूनही आदेशांचा वारंवार अवमान करणाऱ्या फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या याचिका का ऐकायच्या? त्यावर सुनावणी का घ्यावी? असा संताप उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केला. तसेच, चोक्सी जोपर्यंत न्यायालयात उपस्थित होत नाही तोपर्यंत त्याच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाणार नाही, असा इशाराही न्यायालयाने दिला.

हेही वाचा >>> केंद्र सरकारचा इतका ‘महाराष्ट्र द्वेष’ कशासाठी? महामार्गांच्या दुर्दशेवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल

याचिकाकर्ता कुठे आहे? तो फरारी आहे का? मग आम्ही त्याच्या याचिकांवर सुनावणी का घ्यायची? अशी विचारणाही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने चोक्सी याच्या वकिलांकडे केली. त्यावर, चोक्सी याला अद्याप फरारी घोषित केलेले नाही, असे चोक्सीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. परंतु, फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत विशेष सत्र न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. तथापि, सध्या तो फरारीच आहे, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. त्यावर, नीरव मोदी कुठे आहे? मेहुल चोक्सी कुठे आहे? याचिकांवर सुनावणी घेण्यापूर्वी ती व्यक्ती जिवंत आहे हे आम्हाला कळले पाहिजे. या व्यक्ती न्यायालयातही उपस्थित झाल्या तरच त्यांच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती डांगरे यांनी म्हटले.

हेही वाचा >>> सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी २७० कोटी! निवडणुकीसाठी मतदारांवर प्रभाव पाडण्याकरिता निधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीमध्ये आपल्यालाही उलटतपासणी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा चोक्सी याने एका याचिकेद्वारे केला आहे. तर याच प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यामध्ये काही पुरावे सादर करण्याची मागणी दुसऱ्या याचिकेद्वारे त्याने केली आहे. दोन्ही मागण्या २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने फेटाळ्यानंतर चोक्सी याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आम्हाला विशेष न्यायालयाबद्दल माहिती नाही. परंतु आम्ही या याचिकांवर सुनावणी घेणार नाही, असे स्पष्ट करून खंडपीठाने याचिकांवरील सुनावणी स्थगित केली.