अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणार की केवळ स्मृतिदिनच करत बसणार, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआय तसेच राज्य सरकारला फटकारले. एवढेच नव्हे तर तपास करण्याऐवजी दोन्ही हत्याकांडातील साधम्र्य शोधण्यात तपास यंत्रणा गुंतल्याचा टोलाही न्यायालयाने हाणला. न्यायालयाने पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सनातन संस्थेच्या समीर गायकवाड विरोधातील खटल्याला स्थगिती देण्यासही नकार दिला.
दाभोलकर तसेच पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मारेकऱ्यांचा माग लावण्याऐवजी दोन्ही हत्या प्रकरणांतील साधम्र्य शोधण्यात गुंतलेल्या सीबीआयला आणि विशेष तपास पथकाला न्यायालयाने धारेवर धरले. तुम्ही तपासाच्या अहवालाची मोहोरबंद पाकिटे सादर करायची आणि आम्ही फक्त ती जमा करत बसायचे का, असेही न्यायालयाने सुनावले.