मुंबई:  पालिकेच्या आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील ९९ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वर्धक मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडाची पातळी जास्त असल्याचे पालिकेच्या सहाव्या सेरो सर्वेक्षणातील अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

करोनाची साथ आटोक्यात येत असली तरी करोना प्रादुर्भावाचे प्रमाण आणि वर्धक मात्रेची उपयुक्तता याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने शहरात सहावे सेरो सर्वेक्षण केले. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ९९ कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने यात तपासण्यात आले. यातील ९९ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली असून ९९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. सुमारे ९७ टक्के कर्मचाऱ्यांनी कोविशिल्ड तर सुमारे तीन टक्के कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ४३ वर्षे असून यात ५८ टक्के पुरुष तर सुमारे ५० टक्के महिलांचा सहभाग होता.

३६ टक्के कर्मचाऱ्यांची वर्धक मात्रा पूर्ण

कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३६ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतलेली होती. दोन मात्रा घेतलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत यांच्यामध्ये प्रतिपिंडे जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.  कर्मचाऱ्यांमधील सुमारे १६ टक्के कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांत करोनाची बाधा झालेली आहे. करोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रतिपिंडे असल्याचे दिसून आले आहे. कोविडचा नैसर्गिक संसर्ग झालेल्या आणि लस घेतलेल्या अशा संकरित प्रतिकार क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सरासरी प्रतिपिंड पातळी अधिक असल्याचे आढळले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सहा महिन्यांनी पुन्हा तपासण्या  करोना व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी  ह्यांच्या शरीरात प्रतिपिंडांची स्थिती नेमकी कशी आहे, लसीकरण आणि नैसर्गिकरीत्या संसर्ग ह्यांचा नेमका प्रतिपिंडावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास सर्वेक्षणातून केला जात आहे. संख्यात्मकदृष्टय़ा प्रतिपिंडांची पातळी यात मोजली जात असून असे हे पहिलेच सेरो सर्वेक्षण आहे.