मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी १९१ इतका होता. काही भागात ‘अतिवाईट’ तर, काही भागात ‘वाईट’ हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे.

बोरिवली येथे बुधवारी सायंकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०४ नोंदवला गेला. त्याचबरोबर देवनार, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २४३, २२१, २६५, २८६, ३००, २१७, २४७ इतका होता. असे वातावरण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याशिवाय भायखळा, मुलुंड, पवई परिसरातील हवा ‘मध्यम’ असल्याची नोंद बुधवारी झाली.

हेही वाचा – बेस्ट बस अपघात : अहवाल येण्यापूर्वीच महाव्यवस्थापकांची बदली, कंत्राटदारावरही कारवाई नाही

हेही वाचा – नाताळच्या सुट्टीनिमित्त राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ, महानगरपालिकेच्या तिजोरीत ३ लाखांचा महसूल जमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे सध्या शहरातील हवा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनाद्वारे शरीरात जातात, त्याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ४५ मायक्रो घनाहून जास्त नसावे. हे कण पीएम १० च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ते आरोग्यास घातक ठरतात. धुलीकणांत कार्बन सल्फेट, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यास ते धोकादायक ठरते. यामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढतात. श्वसन विकारात दमा, न्युमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे तसेच त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढत आहे.