मुंबई : पार्टीनंतर उद्भवलेल्या वादामुळे एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला चक्क गाडीच्या बोनेटवरून फरफट नेल्याचा प्रकार बोरिवलीत घडला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून बोरिवली पोलिसांनी आरोपी तरूणाला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली.

इव्हेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला तरुण पश्चिम उपनगरात वास्तव्यास असून एका स्पामध्ये काम करणारी तरुणी त्याची मैत्रीण होती. तरुणी तिच्या सहकाऱ्यांसह २२ ऑक्टोबर रोजी एका पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. तिथे तिचा मित्रही होता. २३ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ च्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र आणि अन्य दोघे त्याच्या मोटारगाडीतून घरी जाण्यासाठी निघाले.

वाटेत त्याचे दोन्ही मित्र उतरले आणि तरुण तिला घरी सोडायला निघाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास, तिचा फोन वाजला तेव्हा त्याने फोन हिसकावून घेतला. मोबाइल परत मागितल्यानंतर तो देण्यास त्याने नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणाने मोटारगाडी थांबवली आणि तरुणीला शिवीगाळ केली, तसेच त्याने तिला मारहाणही केली.

या प्रकारामुळे तरुणी मोटारगाडीतून खाली उतरली आणि मोबाइलची मागणी करीत ती मोटारीच्या बोनेटवर चढून बसली. यावेळी, तरुणाने अचानक मोटार भरधाव वेगात पळवली. गाडीच्या वेगामुळे तरुणी खाली पडली आणि मोटारीसोबत फरफटत गेली. तिला पडलेले पाहूनही तरुणाने गाडी थांबवली नाही आणि तो वेगाने पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनस ) च्या कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), कलम ११५ (२) (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे) आणि सार्वजनिक शांतता भंग करणे (कलम ३५२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.