मुंबई : मुंबईतील प्रमुख उड्डाणपुलांवर शोभिवंत फुलझाडांचा साज चढविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबईतील २० उड्डाणपुलांची निवड करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर शोभिवंत फुलझाडांच्या दोन हजार कुंड्या या उड्डाणपुलांवर ठेवण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने आता फेरनिविदा मागविल्या आहेत. मुंबईतील गटाराची (मॅनहोल) झाकणे चोरीला जात असून या कुंड्या सुरक्षित राहतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील प्रमुख उड्डाणपुलांच्या मधल्या जागेत शोभिवंत फुलांच्या कुंड्या बसवण्याचे ठरवले आहे. त्याकरीता २० उड्डाणपुलांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात जागेनुसार सुमारे दोन हजार कुंड्या बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे उद्यान विभागाने आता फेरनिविदा मागविल्या आहेत. या कुंड्यांमध्ये बोगनवेलची लागवड करण्यात येणार आहे. बोगनवेल फार उंच वाढत नाही. कमी पाण्यात वाढते आणि या झाडाला वर्षभर फुले येतात. त्यामुळे उड्डाणपुलावर वाहनचालकांना डोळ्यांना सुखद वाटावे याकरीता बोगनवेलीची निवड करण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव

अधिक रुंदीचे दुभाजक असलेल्या उड्डाणपुलांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग, आर उत्तर विभागातील जोड रस्ता (लिंक रोड), एच पूर्व विभागातील वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) येथून वाकोलाला जाणारा उड्डाणपूल, वांद्रे पश्चिम विभागातील मीलन उड्डाणपूल, लालबाग उड्डाणपूल, मालाडमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगावमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे उड्डाणपूल, सुधीर फडके उड्डाणपूल, कुर्ला येथून जाणारा सांताक्रूझ – चेंबूर जोड रस्ता उड्डाणपूल, राजयोगिनी ब्रह्मकुमारी ब्रुजिंद्र दादीजी उड्डाणपूल (शीव पूल), नंदलाल डी. मेहता उड्डाणपूल (माटुंगा उड्डाणपूल), नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल (दादर उड्डाणपूल), एम पूर्व विभागातील पूर्व मुक्त मार्ग, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता उड्डाणपूल, शीव – पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, मुलुंडमधील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, शीव – वांद्रे जोडरस्ता, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, घाटकोपरमधील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, चेंबूरमधील पूर्व मुक्त मार्ग, सुमन नगर जंक्शन ते चंदननगर वाहतूक दिव्यांपर्यंतचा भाग यांचा समावेश आहे.

हेही वाचा – पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी, चौघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही शहरांमध्ये कुंड्या चोरीला जाण्याचे प्रकारही घडले आहेत. तर मुंबईत अनेकदा सार्वजनिक वस्तूंची नासधूस करण्याचे किंवा वस्तू चोरून विकण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या कुंड्या किती सुरक्षित राहतील याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. उड्डाणपुलांवर बसवण्यात येणाऱ्या कुंड्या फायबरच्या असून झाड व माती यासह या कुंड्यांचे वजन ७० ते ८० किलो होईल. त्यामुळे एका व्यक्तीला त्या सहज उचलता येणार नाहीत. त्यामुळे या कुंड्या चोरीला जाण्याची शक्यता नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.