मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरामधून वाहणाऱ्या दमणगंगा नदीवर पूल उभारण्यात आला आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामधील गुजरातमधील नियोजित २१ नदी पुलांपैकी हा १६ वा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यातील सर्व पाच नदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधण्यात येत आहेत.

नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने ( एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात एकूण २५ नदी पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी गुजरातमधील २१ आणि महाराष्ट्रात ४ नद्यांवर पूल उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत १५ नदी पूल बांधून पूर्ण झाले आहेत. तर, ७ जुलै रोजी दमणगंगा नदीवर १६ वा पूल उभारण्यात आला आहे.

नदीवरील पुलाची मुख्य वैशिष्ट्ये

⁠लांबी – ३६० मीटर

– ९ पूर्ण स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर)

– पिअरची उंची १९ मीटर ते २९ मीटर

– ⁠ ४ मीटर लांबीचा एक, ५ मीटर लांबीचा एक आणि ५.५ मीटर व्यासाचे ८ गोलाकार पिअर.

– ⁠हा पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यानच्या दारोठा नदी पुलाचे बांधकाम पूर्वीच पूर्ण झाले आहे.

– ⁠ही नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे एक किमी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकापासून ६१ किमी अंतरावर आहे.

– ⁠वलसाड जिल्ह्यात पूर्ण झालेले इतर नदी पूल म्हणजे औरंगा (३२० मीटर), पार (३२० मीटर), कोलक (१६० मीटर) आणि दारोथा (८० मीटर) असे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनसामान्यांसाठी दमणगंगा नदी जीवनवाहिनी

नाशिक जिल्ह्यातील वलवेरी गावाजवळील सह्याद्री पर्वतरांगामधून दमण गंगा नदी उगम पावते. ती सुमारे १३१ किलोमीटर वाहते. महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली, दमणमधून जाते आणि नंतर अरबी समुद्राला मिळते. पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी या नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. वापी, दादरा आणि सिल्वासासारखी औद्योगिक शहरे या नदीच्या काठावर आहेत. नदीवरील मधुबन धरण हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे. गुजरात, दादरा नगर हवेली आणि दीव दमणसाठी ही नदी खूप महत्त्वपूर्ण आहे. या नदीमुळे येथील सिंचन, पाणीपुरवठा आणि वीज निर्मितीसाठी पाणी मिळते.