मुंबई: गोरेगाव स्थानकापासून आत सुमारे दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोशी परिसरातील नागरिकांना आता बेस्ट प्रवासात दिलासा मिळणार आहे. गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथून बेस्टच्या मिनीबस ऐवजी आता मोठ्या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच गाडयांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दिंडोशी, नागरीनिवारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा बसचा प्रवास सुकर होणार आहे.
पश्चिम उपनगरातील गोरेगाव स्थानकापासून दिंडोशी हे अंतर खूप जास्त आहे. दिंडोशी येथून गोरेगाव स्थानकात येण्यासाठी किंवा स्थानकातून दिंडोशीला जाण्यासाठी तेथील रहिवाशांना खूप त्रास सोसावा लागतो. या अंतरासाठी रिक्षाचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तसेच बसगाड्यांची संख्याही कमी असल्यामुळे अनेकदा बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. बसची संख्या कमी असल्यामुळे व लहान आकाराच्या बसेसमुळे अनेक प्रवाशांना बसायला मिळत नाही. उभ्यानेच प्रवास करावा लागतो. तर हे अंतर चालत गाठायचे ठरवले तर त्याला ४० ते ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे दिंडोशी परिसरातील नागरिकांना रोज कामानिमित्त प्रवास करणे हे कठीण झालेले आहे. मात्र आता गोरेगाव ते दिंडोशी मार्गावर मोठ्या बसगाड्या देण्यात येणार असल्यामुळे या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
दिंडोशीचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले की, गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथील चार मिडी गाड्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार भंगारात जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत इतर डेपोमधून एकूण तेरा अतिरिक्त मोठ्या आकाराच्या बसगाड्या गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्या मोठ्या असल्याने एकाच गाडीत दोन मिनी गाड्यांच्या प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रतीक्षेत होणारा त्रास कमी होणार आहे.
सध्या गोरेगाव स्थानक ते नागरी निवारा १ व २ या ६४६ बस मार्गावर पाच गाड्या तसेच ३२७ क्रमांकाची गाडी (गोरेगाव स्थानक ते शिवशाही प्रकल्प, मंत्री पार्क) या मार्गावर चार गाड्या आणि ३४६ या मार्गावर चार गाड्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, मिनी गाड्यांचा आकार लहान असल्यामुळे अनेक प्रवाशांना दुसऱ्या गाडीची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे आमदार सुनिल प्रभु यांनी तत्कालीन बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर तसेच श्रीनिवासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. यामुळे नागरी निवारा व मंत्री पार्क मार्गावर मोठ्या गाड्या देण्यात आल्या आहेत.
गोरेगाव डेपोमध्ये नुकत्याच मोठ्या बसगाड्या दाखल झाल्या असून त्याची पाहणी प्रभू यांनी केली. त्यावेळी ते म्हणाले की, गोरेगाव विभागातील प्रवासी नेहमीच गर्दीमुळे त्रस्त होत होते. विशेषतः नागरी निवारा आणि मंत्री पार्क या मार्गांवर गाड्यांची क्षमता कमी असल्याने प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांची वाट पाहावी लागत होती. मात्र आता मोठ्या गाड्या उपलब्ध झाल्याने एकावेळी जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, वाहतूक अधिक कार्यक्षम होईल आणि गर्दीवरही नियंत्रण मिळेल.