मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसास सदनिका मोफत मालकी तत्वावर प्रदान केल्या जातात. त्यासाठीच्या सेवा कालावधीची अट २५ वर्षांवरून २० वर्षे करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी तत्काळ अंमलबजावणी करावी.
ज्या महापालिका अथवा नगरपालिका अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पवार यांनी दिले.