मुंबई : गोरेगावमधील बांगुर नगरमध्ये कृष्ण लीला सोसायटीजवळ सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. खड्ड्याभोवती बॅरिकेड्स न लावल्यामुळे मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला दंड करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना, अपघात होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून बॅरिकेड लावण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना वारंवार दिले आहेत. तरीही त्याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करतात. बांगुर नगरमध्ये घडलेल्या घटनेतही काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना सुरक्षितता म्हणून बॅरिकेड लावण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी कार थेट कामासाठी खणलेल्या खडड्यात पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अचानक मुसळधार पाऊस आल्याने कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांनी पावसापासून बचावासाठी तेथून काढता पाय घेतला. त्याच वेळी येथून जाणाऱ्या एका वाहनाने उजव्या दिशेने जाण्यासाठी रस्त्यावर प्रवेश करताच, काम सुरू असल्याचे न समजल्याने हे वाहन खड्ड्यात गेल्याचे महापालिकेच्या अभियंत्याने सांगितले. ही कार जेसीबीच्या मदतीने खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाय न केल्याने कंत्राटदाराला दंड आकारण्यात येईल, असे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.