मुंबई : दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे सिंदूर असे नामकरण केल्यामुळे समाजमाध्यमांवर मुंबईकरांनी चांगलीच टीका केली आहे. इथेही हिंदीच नाव का मराठी नाव मिळाले नाही का, मराठीत काय पुलाला कुंकू पूल म्हणायचे का असे सवाल मुंबईकरांनी उपस्थित केले आहेत. तर प्रभादेवी पुलाचे नाव ‘मांग भरो’ असे ठेवा असाही सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. आता काय सिंदूरवरून गाड्या न्यायच्या का असा टोला मुंबईकरांनी लगावला आहे.
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचे (आधीचा कर्नाक) लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. या पुलाचे कर्नाक हे जुने नाव बदलून सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर कर्नाकचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
त्यानुसार पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सिंदूर मोहीमेवरून पुलाचे नाव सिंदूर ठेवण्यात आले आहे. मात्र, या नावावरून मुंबईकरांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. पूल सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी पुलाला सिंदूर नाव देण्यामागचे राजकारण, हिंदी भाषेचा आग्रह अशा सगळ्याच मुद्द्यावरून महापालिकेला व भाजपला लक्ष्य केले आहे.
राज्यात हिंदी भाषेवरून वातावरण तापलेले असताना पुलाचे नावही सिंदूर या हिंदी शब्दावरून दिल्यामुळे मुंबईकरांनी खूप टीका केली आहे. मराठी नावे मिळाली नाहीत का, इथे पण हिंदीची गुलामगिरीच, सिंदूर नाव देणे हे राजकारण नाही का, महात्मा जोतिबा फुले मंडईकडे जाणारा हा पूल आहे तर महात्मा फुले यांचे नाव का नाही दिले, असे प्रश्न नागरिकांनी समाजमाध्यमांवर उपस्थित केले.
सिंदूर ऐवजी मग कुंकू किंवा शेंदूर असे मराठी नाव ठेवायचे, आता प्रभादेवी पुलाचेही नाव बदलून ‘मांग भरो’ असो ठेवा म्हणजे मांग भरो सिंदूर पूल असा एकत्रित उल्लेख होईल, अशी खिल्ली उडवली जात आहे. हिंदी नाव कशाला हा पूल काय बिहारमध्ये बांधला आहे का, सिंदूर वरून गाड्या न्यायच्या का असे खोचक टोलेही शासन आणि महापालिकेच्या वाट्याला नागरिकांकडून आले आहे.
काही मुंबईकरांनी भाजपच्या ऑपरेशन सिंदूरवरच टीका केली आहे. एका अयशस्वी निर्णयाचे नाव पुलाला कशाला अशा शब्दात टीका होऊ लागली आहे. आता असाही सवाल काही मुंबईकरांनी विचारला आहे.