मुंबईः समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या १२ प्रोफाईलविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या वतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांची जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आली होती. याप्रकरणी समाज माध्यमांवरील संशयीत प्रोफाईल वापरकरणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

याप्रकरणी ट्वीट (एक्स), फेसबुक, इन्स्टाग्राम व यू ट्युबवरील १२ प्रोफाईलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. भारत भावला शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, सौरभ सिंह चौहान, मुकेश लव्हाटे, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कणकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट २३० के व विष्णू भोतकर यांनी अपूर्ण अथवा छेडछाड केलेला व्हिडिओ प्रोफाईलवर अपलोड केला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक या चित्रफिती अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (१) (ब), ३५६ (२), १९२, ३ (५) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – मुंबई : पालिकेच्या जी दक्षिण विभागात नागरिकांसाठी टोकन सुविधा; वरळी, प्रभादेवीवासियांना दिलासा

हेही वाचा – सायबर फसवणुकीतील ४ कोटी ६५ लाख वाचवण्यात पोलिसांना यश, सिम स्वॅपिंगद्वारे खात्यातून साडेसात कोटी काढले होते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोटीस जारी केली असून समाज माध्यमांवरील संबंधित प्रोफाईल कोण हाताळत आहे, याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. मुख्यमंत्री संविधानाला मानत नाहीत, अशा आशयाची ही चित्रफित होती. त्यात विधानसभेतील मुख्यमंत्र्यांची भाषण मोडून-तोडून एक चित्रफीत तयार करण्यात आली आहे. फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांवर खोटे संदेश पसवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा, तसेच सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी इंटरनेटवरील संशयीत पोस्टवर विशेष लक्ष ठेवले जाते. महाराष्ट्र सायबर विभागाचे पथक अशा पोस्टवर लक्ष ठेवून असते. कायदा व सुव्यवस्थेला घातक ठरणाऱ्या पोस्ट तात्काळ हटवण्यात येतात. याप्रकरणीही अशा काही पोस्ट तपासणीत आढळल्या होत्या. त्या कोणी तयार केल्या, याबाबत महाराष्ट्र सायबर विभाग तपास करत आहे.