मुंबई : कुलाबा येथील मस्कारा कलादालनातील प्रदर्शनात चित्रातून हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्र मांडण्यात आल्याने संताप उसळळला आहे. याप्रकरणी एका वकीलाने केलेल्या तक्रारीनुसार कुलाबा पोलिसांनी चित्रकार आणि कलादालनाच्या मालकाविरोधात धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलाब्यातील तिसऱ्या पास्ता लेनमध्ये ‘गॅलरी मस्करा’ नावाचे कलादालन (आर्ट गॅलरी) आहे. मुंबईतील एका वकिलाने या कलादालनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या कलादालनात हिंदू देवतांची आक्षेपार्ह आणि अवमानकारक चित्रे, तसेच पुरुष व स्त्रियांची लैंगिक कृती दाखवणारी नग्न छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हॉटसअपग्रुपवर मिळाली माहिती

मशिद बंदर येथे वास्तव्यास असलेले तक्रारदार ॲड. विशाल नखवा (४५) यांना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर मस्कारा कलादालनातील प्रदर्शनात हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्रे मांडण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नखवा यांनी या कलादालनाला भेट दिली.

आक्षेपार्ह चित्रे

या कलादालनात टी. वेंकण्णा यांचे ११ सप्टेंबरपासून चित्रप्रदर्शन सुरू आहे. ते १ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. नखवा यांनी सांगितले की, तेथे देवी महाकाली व भगवान शंकर यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील चित्र होते. याशिवाय, नग्नावस्थेतील पुरुष व स्त्रियांची लैंगिक अवस्थेतील छायाचित्रे देखील प्रदर्शनात मांडण्यात आली होती. तरी देखील अल्पवयीन (१८ वर्षांखालील) व्यक्तींना प्रवेश निषिद्ध असल्याचा कोणताही इशारा फलक तेथे लावण्यात आला नव्हता.

पोलिसांना पाचारण केले

त्यानंतर नखवा यांनी आपले सहकारी वकील मदन श्रीकृष्ण रेड्डी यांना फोन केला. रेड्डी कलादालनात आले. कलादान आतून बंद करण्यात आले होते. त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी आले.

चित्रकार आणि कलादालनाविरोधात गुन्हा

यानंतर नखवा यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन कलादालनाचे मालक अभय मस्कारा आणि कलाकार टी. वेंकण्णा यांच्याविरुद्ध सार्वजनिकरित्या हिंदू देवतांची अश्लील चित्रे प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल औपचारिक तक्रार दाखल केली. त्याअनुषांगे या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.