मुंबई- राजस्थानमधील एका सराफाला मारहाण करून त्याच्याकडील ३० हजार रुपये लुटणार्या तीन पोलिसांविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात १ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
तक्रारदार कुलदीप कुमार सोनी (३७) हे सराफ असून ते राजस्थानात राहतात. सोनी १ ऑगस्ट रोजी आपल्या मुलीसह सोन्याच्या एका प्रदर्शनासाठी मुंबईत आले होते. सोनी यांनी आपल्या सोबत १४ ग्रॅमचा सोन्याची लडी नेली होती. ती एका सराफाला दाखवून त्यावरून नमुन्यानुसार दागिना घडवायचा होता. ती लडी त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवली होती. ते १० ऑगस्ट रोजी ते पुन्हा राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ते ७ वर्षांची मुलगी आणि मेहुण्यासह मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचले. त्यांची ट्रेन रात्री ११ वाजता होती. फलाट क्रमांक ५ वर पोलीसांच्या गणवेशातील असलेल्या एका व्यक्तीने सोनी यांना थांबवले आणि त्यांची बॅग तपासली. त्याच्यासोबत पोलीस गणवेषात आणखी दोनजण होते.
मुलीसमोरच मारहाण
त्या पोलिसांना सोनी यांच्या बॅगेतून सोन्याचा बार आणि ३१ हजार ९०० रूपये आढळले. त्याबद्दल त्या पोलिसांनी जाब विचारला. माझ्याकडे सोन्याच्या पावत्या असल्याचे सांगितल्या नंतरही पोलिसाने सोनी यांना मुलीसमोर शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर फलाटाजवळच्या एका अंधाऱ्या खोलीत नेऊन दमदाटी करत अटक करण्याची धमकी दिली. ट्रेन सुटण्याच्या वेळी त्या तीन पोलिसांनी सोनी यांच्याकडील ३० हजार रुपये काढून सोडून दिले.
तीन पोलिसांविरोधात गुन्हा
राजस्थानला परत गेल्यावर सोनी यांनी या प्रकाराबाबत रविवारी रतनगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) हस्तांतरित करण्यात आला. सोनी यांच्या तक्रारीवरून मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११९ (१) अंतर्गत गुन्हा गंभीर दुखापत करून मालमत्ता उकळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेकडे तपास
तक्रारदाराने तीन गणवेषातील पोलिसांनी लुटल्याची तक्रार दिली आहे. मात्र त्याला त्या गणवेषावरील नावाची पट्टी वाचता आली नाही. त्यामुळे नेमके कुठले पोलीस होते हे निश्चित सांगता येणार नाही, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांवरच आरोप असल्याने हा रेल्वे गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.