मुंबई : विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्याच्या वेळी आमदारांचे वास्तव्य असलेल्या शासकीय विश्रामगृहात समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या सचिवाच्या कक्षात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ माजली . ही रक्कम आमदारांना वाटण्यासाठी आणण्यात आली होती, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली. तसेच कक्ष अधिकारी तथा समिती प्रमुखांचे सचिव किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
अंदाज समितीचे सदस्य सध्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आमदार धुळ्यात पोहोचले असता गोटे यांनी समिती प्रमुख व शिवसेना (शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांच्या सचिवाच्या दालनात पाच कोटी रुपयांची रोख रक्कम असल्याचा आरोप केला होता. गोटे यांनी सहा तास कक्षाबाहेर ठिय्या मारल्याने शासकीय यंत्रणांचा नाइलाज झाला. शेवटी बुधवारी रात्री काही अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत कक्ष उघडण्यात आला. तेव्हा १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. हा कक्ष समिती प्रमुख खोतकर यांचे सचिव किशोर पाटील यांच्या नावे आरक्षित करण्यात आला होता. समिती सदस्य आमदारांना वाटण्यासाठीच ही रोख रक्कम तेथे आणली होती, असा आरोप गोटे यांनी केला. त्यामुळे आमदारांबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले.
कक्ष अधिकारी निलंबित
या प्रकरणी समिती प्रमुखांचे सचिव व विधिमंडळातील कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यात येत असल्याचेही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
आधी आरोप, आता रोख रक्कम
विधानसभेत लक्षवेधीसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केला होता. त्यावरून गदारोळ झाला होता. आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी जवळपास दोन कोटींची रोख रक्कम सापडल्याने पुन्हा एकदा संशयाचे वातावरण तयार झाले आहे. यापूर्वीही दौऱ्यात आमदारांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप झाले होते. विशेष म्हणजे सोमवारीच समित्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले तेव्हा त्यांनीही समित्यांच्या कामकाजाविषयी नापसंती व्यक्त केली होती.
अंदाज समितीचे काम काय?
विधिमंडळात विविध समित्या कार्यरत आहेत. यापैकी एक अंदाज समिती. या समितीत उभय सभागृहाच्या २९ सदस्यांचा समावेश असतो. अर्थसंकल्पीय अंदाज आणि पूरक अनुदानाच्या मागण्यांची छाननी करणे तसेच काटकसरीचे उपाय सुचविणे हे समितीचे मुख्य काम असते. समितीचे सदस्य विविध ठिकाणी दौरे करून खर्चाच्या अंदाजांची तपशीलवार छाननी करतात तसेच शासनाची उद्दिष्टे काटकसरीने व कार्यक्षम रीतीने पार पाडण्यासाठी सल्ला देतात. पूरक अनुदानाच्या मागण्यांची छाननी केली जाते. समितीकडे विचारार्थ पाठविण्यात येईल अशा कोणत्याही वित्तीय प्रश्नांवर सरकारला सल्ला देणे. आर्थिक बाबींच्या संदर्भात अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा समितीला अधिकार आहे.
विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात रक्कम आढळल्याची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली.
अंदाज समिती आणि राज्य शासनाला बदनाम करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी तथ्यहीन आरोप केले आहेत. रोकड आढळलेल्या खोलीत माझा स्वीय सहाय्यक राहत नव्हता. हे विरोधकांचे षडेयंत्र आहे.- अर्जुन खोतकर, अध्यक्ष, विधिमंडळ समिती सदस्य