मुंबई : मोतीबिंदू हा आजार हजारो वृद्ध, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला तरी आरोग्य विभागाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेत एका महिन्यात एक लाख शस्त्रक्रिया करण्यचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात अवघ्या एका मिहिन्यात एक लाख २४ हजार रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियेत पुणे जिल्ह्याने सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्या तर त्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.

मुख्यमंत्रीपदाच्या मागील काळात देवेंद्र फडणवीस यांनी मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियान राबविले होते. त्यावेळी म्हणजे २०१७ साली तब्बल १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.आता आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांच्या संकल्पनेतून तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या सहकार्यातून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या एक महिन्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेसाठी एक लाख शस्त्रक्रिया महिनाभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात आरोग्य विभागाने राबिवलेल्या या मोहीमेत एक लाख २४ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.अर्थात या शस्त्रक्रियेत स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी रुग्णालयांचे योगदान खूपच मोठे असून त्या तुलनेत आरोग्य विभागाने केलेल्या शस्त्रक्रियांची संख्या मर्यादित आहे.

या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीमेत प्रत्येक जिल्ह्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यात पुणे जिल्ह्याला साडेआठ हजार शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते तर त्यांनी तब्बल २५,८७७ शस्त्रक्रिया केल्या. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यानेही उद्दिष्टापेक्षा दुपटीहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे जिल्ह्याला ७१८२ शस्त्रक्रियांच लक्ष्य दिले होते. त्यांनी १३,३५१ शस्त्रक्रिया केल्या. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांनी सांगितले की, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही, तर नवदृष्टी देणारा सामाजिक प्रयत्न आहे. रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण हेच यशाच खर फलित आहे. या मोहिमेमुळे ठाणे जिल्हा म्हणजे “नवदृष्टीचा जिल्हा” म्हणून ओळख मिळवत आहे. तिसऱ्या क्रमांकारव असलेल्या मुंबईसाठी ११,०७३ शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्यक्षात मुंबईत केवळ ८,७२३ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून निश्चित केलेल्या या महिन्यासाठीच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पनेत एक लाखाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्या तरी यातील आरोग्य विभागाची कामगिरी निराशाजनक म्हणावी लागेल. या एक लाख शस्त्रक्रियांमध्ये आरोग्य विभागाने अवघ्या १४,०६५ शस्त्रक्रिया केल्या असून त्यापाठोपाठ स्वयंसेवी संस्थांनी २७,३८५ शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्वाधिक शस्त्रक्रिया या खाजगी रुग्णालयात करण्यात आल्या असून त्या तब्बल ८२,८९५ एवढ्या आहेत. हे लक्षात घेतल्यास आगामी काळात आरोग्यमंत्री व राज्यमंत्र्यांना आरोग्य विभागाअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया कशा वाढवता येतील याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

राष्ट्रीय दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम १९७६ पासून केंद्र शासनाने सुरु केला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालाचा विचार करता २००६-७ मध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण १.१ टक्का होते ते २०१९-२० मध्ये ०.३६ टक्के झाले आहे. केंद्र शासनाच्या मोतीबिंदूमुक्त भारत या राष्ट्रीय धोरणानुसार २०२५ पर्यंत हे प्रमाण ०.२५ टक्के पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडून सुरुवातीला शंभर टक्के अनुदान दिले जात होते. मात्र सन २०१५-१६ पासून पासून ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य शासनाचा वाटा अशा पद्धतीने निधी दिला जात आहे.केंद्र शासनाने २०२२ पासून “राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” सुरू केले आहे. यामध्ये ५० वर्षांवरील नागरिकांमध्ये मोतीबिंदूमुळे होणारे गंभीर दृष्टीदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत सुमारे २७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात देशभरात २८ लाख ९१ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.