मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रचलेल्या सापळ्यात वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) अधीक्षकासह निरीक्षक अडकले. एका व्यावसायिकाला जीएसटी प्रमाणपत्र देण्यासाठी या दोघांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदारांचा तयार कपड्यांचा व्यवसाय आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने सांताक्रूझ येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या (पश्चिम) कार्यालयाकडे जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केला होता. पाहणीनंतर जीएसटीकडून प्रमाणपत्र दिण्यात येणार होते. त्यानुसार वस्तू आणि सेवा कर विभागातील निरीक्षकाने पाहणी केली होती. परंतु प्रमाणपत्र देण्यास तो टाळाटाळ करीत होता. सकारात्मक पाहणी अहवाल आणि त्याआधारे नोंदणी प्रमाणपत्र हवे असल्यास २५ हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली.

जीएसटी कार्यालयात सापळा

तक्रारदाराच्या कंपनीत काहीच त्रुटी नव्हत्या. त्याला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्याने या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाकाकडे (सीबीआय) तक्रार केली. यानुसार सीबीआयने बुधवारी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना अधीक्षक आणि निरीक्षाला अटक करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आले.