मुंबई : राज्यात अनेक भागांत थंडी पडायला सुरुवात झाली आहे. दिवसा आणि रात्री थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सध्या जाणवत असलेले थंडीचे प्रमाण त्याच पातळीत राहण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टीबरोबरच मुंबई किनारपट्टीवरही ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मुंबईकरांना हलक्या थंडीचा सुखद आनंद घेता येईल.
मुंबईमध्ये कमाल तापमानचा पारा अजूनही चढा आहे. पहाटे धुके, दुपारी उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई शहर वगळता राज्यातील अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. उत्तर भारतात थंडी सुरू झाली असून तेथे बर्फवृष्टी होत आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यात थंडी वाढणार आहे. मंगळवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर २४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच सांताक्रुझ केंद्रात ३२.९ अंश सेस्सिअस कमाल तापमान, तर २३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा >>>मुंबई : वाहन चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातून दोघांना अटक
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस मुंबई तसेच उपनगरांत ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर कमाल तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर किमान तापमान २०-२३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.