मुंबई : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मृगबहारामधील पेरु, द्राक्ष, संत्रा, लिंबू फळपिकांचा विमा आता ३० जून २०२५ पर्यंत काढता येणार आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारामध्ये राबविण्यात येते. मृगबहारामध्ये संत्रा, पेरु, लिंबू , द्राक्ष या पिकांसाठी भाग घेण्याची अंतिम तारीख १४ जून २०२५ होती. पण, विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टल http://www.pmfby.gov.in १३ जून २०२५ रोजी सुरू झाले. वरील चार पिकांना भाग घेण्यासाठी अतिशय अल्प कालावधी मिळाला. त्यामुळे हा कालावधी वाढवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या बाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली असून, आता या चार पिकांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ३० जून २०२५ अशी राहील. पेरू, लिंबू , द्राक्ष, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री कोकाटे यांनी केले आहे.
फळबागेखालील क्षेत्रात वाढ
राज्यातील फळबाग लागवड, फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना देखील आहे. ज्याद्वारे फळबाग लागवडीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
राज्यातील फलोत्पादन वाढवण्यासाठी ‘फळांचे गाव’ ही संकल्पना कृषी विभागाने स्वीकारली आहे, ज्यात ३५८ गावांचा समावेश आहे. फळबागांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, रोजगार निर्मिती होते, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर होतो, राज्यात फळांचे उत्पादन वाढते, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण आहेत.