मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यासाठी शुक्रवारी सकाळी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले. त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंदोलक विविध मार्गाने मुंबईत दाखल होत होते. तर, आझाद मैदान परिसरात, सीएसएमटीच्या स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने आंदोलक उभे होते. तसेच, छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आंदोलक बसले होते. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच सीएसएमटीवरून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी स्थानकावरून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची रहदारी असते. तसेच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे मुंबईतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत. परंतु, शुक्रवारी सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. काही आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले होते, तर काही चक्क झोपले होते. तर, काही आंदोलक जेवण करीत आहेत. एरवी कोणी प्रवासी जास्त वेळ बसल्यास त्याची पोलीस विचारपूस करतात.. तसेच, त्याला लवकरात लवकर तेथून जाण्यास सांगतात. आझाद मैदानात जाणाऱ्या आंदोलकांना जादा वेळ स्थानकात थांबू दिले जात नाही. परंतु, मराठा आंदोलक मात्र गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी दुपारपर्यंत स्थानकातच होते. याबद्दल प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत होते.

सीएसएमटी स्थानकात आणि आजूबाजूला होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना आवश्यक आणि अपरिहार्य असेल तरच सीएसएमटी स्थानकातून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केला आहे.