कुलदीप घायवट, लोकसत्ता

मुंबई : वाढत्या गर्दीचा जाच कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्यानंतर आता याला व्यापक स्वरूप यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सरकारी, निमसरकारी कार्यालयासह ३५० संस्थांशी मध्य रेल्वेने गेल्या १६ दिवसांत पत्रव्यवहार केला असून कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत विनंती केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी तीन ते चार मिनिटांनी एक फेरी धावते. मात्र गर्दीमुळे सेवेवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन पाळय़ांमध्ये विभागले आहे. आता त्याचे अनुकरण करण्याची विनंतीही इतर संस्था, कार्यालयांना करण्यात आली आहे. त्यासाठी १ नोव्हेंबरपासून रुग्णालये, महापालिका, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसिद्धीमाध्यमे, खासगी संस्था, बँकांना कार्यालयीन वेळांमध्ये बदलांची विनंती करण्यात आली आहे. या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Block : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

सुट्टीकालीन वेळापत्रक बदलण्याचा प्रयत्न

रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेवर ‘सुट्टीकालीन वेळापत्रका’नुसार लोकल चालवण्यात येतात. त्यामुळे ३५० फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर सुट्टीकालीन वेळापत्रक बदलण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यावर तोडगा सापडल्यास तो तात्काळ राबवण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा रूळ ओलांडताना ५०५ प्रवाशांचा आणि रेल्वे गाडीतून पडून २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणे आवश्यक आहे.  – रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे