मुंबई : गुरुवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सीएसएमटी येथे आंदोलन करून लाखो प्रवाशांना वेठीस धरले. प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तसेच आंदोलनानंतर रेल्वे रूळावरून चालत जाणाऱ्या पाच प्रवाशांना लोकलने धडक दिली. पाचपैकी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मुळात सीएसएमटी येथील मोटरमन, लोकल व्यवस्थापकाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास परवानगी नव्हती, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी याबाबतचा संपूर्ण अहवाल तयार केला असून तो शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.
ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंब्रा दुर्घटनेत अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने आरोपी केल्याने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. अनुचित कृतीमुळे केवळ अभियांत्रिकी विभागातीलच नव्हे तर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पक्षपाती कृत्याचा निषेध करण्यासाठी संघटनेने गुरुवारी सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचे निश्चित केले. तसेच हा मोर्चा फलाट क्रमांक ७ आणि ८ वरून सुरू होईल व त्याचे रुपांतर एका मोठ्या बैठकीत होईल, असे पत्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी (पीसीपीओ) यांना दिले. परंतु, संघटनेला मोटरमन, लोकल व्यवस्थापकांचे दालन रोखून आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नव्हती, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या आंदोलनात गुरुवारी दुपारी ३ पासून कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनी हातात फलके घेऊन रेल्वे पोलिसांचा निषेध केला. तसेच आंदोलनात ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीचा धिक्कार करण्यात आला. त्यानंतर डीआरएमची भेट घेऊन हा मोर्चा स्थगित होणे अपेक्षित होते. मात्र संघटनेचे पदाधिकारी आणि अभियांत्रिकी विभागातील कंत्राटी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी मोटरमन, लोकल व्यवस्थापकाच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना कोंडून त्यांना बाहेर येऊ न दिल्याने लोकल सेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतल्याने आंदोलन तीव्रता वाढत गेली. परिणामी, मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास रोखण्यात आले. परिणामी, लाखो प्रवाशांना प्रचंड विलंबयातना, धक्काबुक्कीचा प्रवास सहन करावा लागला.
सीएसएमटी येथील मोटरमन, लोकल व्यवस्थापक दालनाबाहेर गुरुवारी झालेल्या आंदोलनाबाबत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात केला आहे. त्यानंतर त्यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही करण्यात येईल. संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे
