मध्य रेल्वेच्या प्रवाशांची दैना पुढील किमान तीन वर्षे तरी कायमच राहणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्या गाडय़ा दाखल झाल्या, तरी सध्या दर चार मिनिटांनी एक फेरी मध्य रेल्वेमार्गावर आहे. त्यामुळे नवीन मार्गिका तयार केल्याशिवाय मध्य रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या वाढवणे कठीण आहे. सध्या ठाणे ते कुर्ला आणि कल्याण ते दिवा हा टप्पा वगळता मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचे काम पूर्णत्वास आलेले नाही. ठाणे-दिवा आणि कुर्ला-परळ या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच अधिक गाडय़ा सोडणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेवर सध्या ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान डीसी-एसी विद्युत प्रवाह परिवर्तनाचे काम सुरू आहे. हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मध्य रेल्वेवरील गाडय़ांचा वेग वाढून त्यामुळे फेऱ्यांची संख्याही वाढेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, असे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात या फेऱ्या फक्त चारच मार्गिकांवरून चालणार आहेत. चारपैकी दोन जलद मार्गिकांवरून सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या फेऱ्यांची संख्या वाढण्याला मर्यादा आहे. परिणामी प्रवाशांच्या सोयीसाठी पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या उभारणीला पर्याय नसल्याचे एका बडय़ा अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सध्या कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ला या दरम्यान सहा मार्गिका आहेत. तर दिवा ते ठाणे या दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे (एमआरव्हीसी) सुरू आहे. या मार्गावर मुंब्रा व कळवा या स्थानकांमध्ये असलेल्या डोंगरात दोन बोगदे बांधणे गरजेचे आहे. या बोगद्यांचे काम पूर्ण झाले असले, तरी त्यापुढे कळव्यापर्यंतचा भूभाग सपाट करण्याचे काम अद्याप संपलेले नाही. हे काम डिसेंबर २०१५पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज एमआरव्हीसीचे मुख्य अभियंता ए. के. जैन यांनी वर्तवला.
त्याचप्रमाणे कुर्ला ते परळ या दरम्यानही पाचवी व सहावी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेमार्फत होणार आहे. कुर्ला-शीव-माटुंगा या स्थानकांदरम्यान विस्तारीकरणासाठी जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. या दोन मार्गिका पूर्ण झाल्याशिवाय महत्त्वाकांक्षी परळ टर्मिनस बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार नाही. यासाठी किमान तीन वर्षे जाण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने वर्तवली. परळ टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर दादर व परळ या स्थानकांवरील गर्दी विभागली जाईल आणि फेऱ्यांची संख्या वाढवणेही शक्य होईल, असे सांगण्यात आले.