‘अच्छे दिन’ येतील, असे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारचा पहिल्या सहा महिन्यांचा कालावधी प्रत्यक्षात मुंबईकर उपनगरीय प्रवाशांसाठी मात्र प्रचंड हालअपेष्टांचा गेला आहे. गेल्या वर्षी मे ते सप्टेंबर या कालावधीच्या तुलनेत यंदा याच वर्षी मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा तीन टक्क्यांनी खाली घसरला आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांत गाडी रुळांवरून घसरणे, रुळ तुटणे, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होणे या घटनांमध्ये वाढ झाल्याने या प्रमाणात वाढच झाली आहे. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांच्या त्रासात वाढ झाली आहे.
मुंबईच्या उपनगरीय गाडय़ांचा वक्तशीरपणा मध्य रेल्वे एका फलकावर दर दिवशी जाहीर करते. प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून बाहेर पडताना बाहेरच्या बाजूस भिंतीवर लावलेल्या डिजिटल फलकावर ‘आज सकाळची’, ‘काल संध्याकाळ’ आणि ‘काल सकाळ’ या तीन वेळी किती टक्के गाडय़ा वेळेत होत्या, हे दाखवण्यात येते. त्यासाठी ऐन गर्दीच्या वेळी नियोजित असलेल्या एकूण गाडय़ा आणि उशिराने धावलेल्या गाडय़ा यांची टक्केवारी काढली जाते. साधारणपणे गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या पाच मिनिटे उशिरापर्यंत पोहोचलेली गाडी ही वेळेत असल्याचे धरले जाते, तर त्यापेक्षा उशीर झाल्यास वेळापत्रकापेक्षा दिरंगाईने धावत असल्याचे समजते.
गेल्या वर्षी मे ते सप्टेंबर या कालावधीत गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा सरासरी वक्तशीरपणा ८८ टक्के होता. यात मध्य रेल्वेच्या ९१ टक्के गाडय़ा सर्वाधिक वेळा ऑगस्ट २०१३मध्ये वेळेवर धावल्या, तर जून महिन्यात हीच टक्केवारी सर्वात कमी म्हणजे ८१ टक्के एवढी होती. यंदा याच पाच महिन्यांच्या कालखंडात ही सरासरी ८५ टक्क्यांवर आली. जुलै महिन्यात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७७ टक्के होते.
कारणे काय?
या दिरंगाईसाठी मुख्यत्वे तीन कारणे असल्याचे मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. यात दिवा स्थानका-जवळील फाटकामुळे दर दिवशी मध्य रेल्वेच्या किमान ४५ सेवा वेळापत्रकापेक्षा दिरंगाईने धावतात. तसेच ठाण्यापर्यंत आणि दिव्यापर्यंत सहापदरी असलेला रेल्वेमार्ग या दोन स्थानकांमध्ये फक्त चारपदरी आहे. त्यामुळे येथे अनेक गाडय़ा धीम्या मार्गावरून जलद मार्गावर किंवा जलद मार्गावरून धीम्या मार्गावर वळवल्या जातात. त्याचा फटका वेळापत्रकाला बसतो.