मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलाची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ठाणे स्थानकात सहाव्या पादचारी पुलाचे काम हाती घेतले आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी सीएसएमटीनंतर ठाणे स्थानकाचा क्रमांक लागतो. सीएसएमटीवर दररोज सुमारे ११ लाख प्रवाशांचा प्रवास होत असून ठाणे स्थानकातून दररोज सुमारे ४.५ लाख नागरिक प्रवास करतात. मुख्य मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाणे स्थानकात प्रवाशांचा प्रवास होतो. त्यामुळे प्रवाशांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे.
हेही वाचा >>> रुग्णालयातील उंदीर पळविण्यासाठी उच्च ध्वनी लहरींचा वापर
ठाणे स्थानकात ये-जा करण्यासाठी पादचारी पुल बांधले जात आहेत. १५ ऑगस्ट रोजी नवा पादचारी पूल खुला करण्यात आला. त्यानंतर आता आणखी एका पुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर एकूण सहा पादचारी पूल तयार होतील. रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने केले. या पुुुलाच्या बांधकामासाठी फलाट क्रमांक ६, ७, ८, ९ आणि १० दरम्यान गर्डर टाकण्यात आले. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर केली जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पूर्वेकडे नवा सरकता जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. वर आणि खाली जाण्यासाठी दोन सरकते जिने खुले केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास न करता सरकत्या जिन्याचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.