मुंबई : बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी भारतीय परिचर्या परिषदेने पात्रता निकषांमध्ये बदल केले होते. त्यामुळे नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या नोंदणी प्रक्रियेदरम्यान राज्यभरातून १२०० विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. त्यामुळे तिसऱ्या फेरीनंतर रिक्त असलेल्या चार हजार जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये आता चुरस पाहायला मिळणार आहे.
बीएससी नर्सिंग पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय भारतीय परिचर्या परिषदेने घेतल्यानंतर पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याचदरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे नोंदणी प्रक्रिया ५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. या नोंदणी प्रक्रियेत तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ९ हजार ५०० इतक्या जागा होत्या. तीन फेऱ्यांनंतर ५ हजार ९३० जागा रिक्त राहिल्या आहेत. तीन फेऱ्यांमध्ये जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त प्रवेश झाले असून, चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान चौथ्या फेरीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबर, रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.
१७ ऑक्टोबरपासून संस्थात्मक फेरी होणार सुरू
चौथी फेरी पार पडल्यानंतर संस्थात्मक फेरी सुरू होणार आहे. त्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी जागांचा तपशील व पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. संस्थात्मक फेरीची पहिली निवड यादी २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २४ ते २६ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असणार आहे.