शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश काशिनाथ हावरे यांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देशातील सर्वांधिक श्रीमंत मंदिर ट्रस्टपैकी एक आहे. या ट्रस्टची वार्षिक उलाढाल ७०० कोटी रुपये इतकी असून २१०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. तसेच प्रत्येक दिवशी २ कोटी रुपयांचे उत्पन्न देणगीच्या स्वरुपात ट्रस्टला प्राप्त होते. ट्रस्टने राज्यातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील ४ वैद्यकीय महाविद्यालयांना ७१ कोटी रुपयांचे दान देण्याचा निर्णय नुकताच ट्रस्टने घेतला आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकतील.

अभिनेते असलेले आदेश बांदेकर हे शिवसेनेचे विद्यमान पदाधिकारी असल्याने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यावरुन राजकीय चर्चेला तोंड फुटले होते. भाजपाविरोधातील शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करीत असल्याचे बोलले गेले होते. मात्र, मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा अध्यक्षाला हे पद देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.

दरम्यान, असे असेल तर राज्यमंत्रीपद केवळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा अध्यक्षालाच का? शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाला का दिले नाही? असा सवाल राजकीय गोटातून सरकारला विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला असावा असे सुत्रांकडून कळते.

मध्य प्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यामध्ये भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. मात्र यातील भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाकारला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chairman of shirdi saibaba sansthan trust suresh haware accorded mos status in maha gov
First published on: 27-06-2018 at 16:27 IST