मधु कांबळे
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे बालेकिल्लेही भुईसपाट झाले. यात दक्षिण -मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघाचा समावेश होता. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदीलाटही पूर्णपणे ओसरली आहे. आता पुन्हा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा जंगी सामना सुरू झाला आहे. दोन-तीन निवडणुकांचा अपवाद वगळला तर, दक्षिण-मध्या मुंबई हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला आहे. त्याचे मुख्य कारण या मतदारसंघाची आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रचना. जवळपास ६० ते ७० टक्के झोपडपट्टय़ांनी, मध्यमवर्गीय आणि कामगार वसाहतींनी व्यापलेला हा मतदारसंघ आहे. काही तुरळक उच्चभ्रू वस्ती आहे. या समीकरणानेच हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने राहिला. गेल्या वेळी शिवसेनेने बाजी मारली असली तरी यंदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
विद्यमान खासदार राहुल शेवाळे हेच पुन्हा शिवसेनेच उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होईल. २००४ व २००९ असे दोन वेळा विजयश्री खेचून लोकसभेत पोहचलेले एकनाथ गायकवाड यांनी पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु त्यांची अधिकृत उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेवाळे यांच्या विरोधात तरुण चेहरा म्हणून गायकवाड यांची कन्या आमदार वर्षां गायकवाड यांच्याही नावाची पक्षात चर्चा आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या मतदारसंघातून भाजप-शिवसेनेच्या पाठिंब्याने निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसबरोबर युती करून १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. आठवले यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेची तयारी नाही. त्यामुळे आठवले यांच्यासाठी दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय दिला जाईल, असे सांगितले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे सूचित केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार काँग्रेसची डोकेदुखी वाढविणार आहे.
काँग्रेसाठी जमेची बाजू म्हणजे शिवसेना व भाजप यांच्यातील संघर्ष. निवडणुकीच्या तोंडावर युती झाली असली, तरी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही. शिवसेना नेते सत्तेत राहून भाजपवर हल्ले करीत राहिले. निवडणुकीत युती झाली म्हणून त्यांचे खरोखर मनोमीलन होईल का, त्यावर शिवसेनेची लढत अवलंबून आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार शेवाळे यांचा दावा आहे की, या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठी विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आपल्याच बाजूने कौल देतील, असा त्यांना विश्वास वाटतो. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ गायकवाड, यांच्या मते केवळ मोदी लाटेवर निवडून आलेले शेवाळे, पाच वर्षांत मतदारसंघात फारसे कुणाला भेटले नाहीत, वा दिसलेही नाही, त्यामुळे विकासकामांचा त्यांचा दावा खोटा आहे. दोन्ही बाजूंकडून असे दावे-प्रतिदावे होणारच. मात्र २०१४ चे वातावरण सध्या नाही, हेही तितकेच खरे आहे. राहुल गांधी यांची मुंबई झालेली सभा आणि झोपडपट्टीवासीयांना व चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टय़ा असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मानले जाते.
दुसरी बाजू अशी आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा व महापालिका निवडणुकीतही या मतदारसंघात युतीचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे तीन व भाजपचा एक असे चार आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. महापालिका निवडणुकीत युतीचेच नगरसेवक जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली असली तरी, काँग्रेससाठी आव्हानात्मक परिस्थिती सध्या तरी कायम आहे.
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात रेल्वे, झोपडपट्टय़ा, रस्ते यासंबंधीची अनेक विकासकामे केली आहेत. युतीचे नगरसेवक जास्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपबरोबर युती झाली असली तरी लोकांनाच युती हवी होती. भाजप व रिपब्लिकन पक्षाशी माझे सलोख्याचे संबंध आहेत, तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी काम करीत आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा माझ्यासाठी या वेळचे वातावरण अधिक चांगले आहे, मला फक्त मतांची आघाडी किती मिळते ते बघायचे आहे.
-राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना
मागील निवडणुकीत मोदीमय वातावरण होते. कारण नरेंद्र मोदींनी भाजपचा नव्हे स्वत:चा प्रचार करून बेरोजगारांना नोकऱ्या, महागाई कमी करू, भ्रष्टाचार मोडून काढू, अशी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. परंतु पाच वर्षांत मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला. राहुल गांधींचा चेहरा लोकांना आश्वासक वाटू लागला आहे. मोदी लाटेत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, आता लाट नाही, मतदारसंघातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे, त्याचा फायदा काँग्रेसलाच होणार.
– एकनाथ गायकवाड, माजी खासदार, काँग्रेस.
विधानसभेचे चित्र
माहिम शिवसेना
शीव-कोळीवाडा भाजप
धारावी काँग्रेस
वडाळा काँग्रेस
चेंबूर शिवसेना
अणुशक्तीनगर शिवसेना