मुंबई शहर आणि उपनगरांत गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये शहर आणि उपनगरात मध्यम ते अति जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. तर, सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आज देखील (गुरुवार) मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची, तसेच ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडला. शहर भागात ८८ मि.मी., पूर्व उपनगरात ९६ मि.मी., पश्चिम उपनगरात ७९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मुंबई : तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या तुलनेत भरघोस वाढ

मुंबईमध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस पडला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत २२०० ते २५०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत महिन्याभरातच ११०० मिमी पाऊस पडला आहे. दुपारी १२.३० वाजता भरतीची वेळ आहे. यावेळी ४.८२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकल वेळापत्रक विस्कळीतच –

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारीही मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा मार्गावरील अप-डाउन लोकल १० ते १५ मिनिटे, सीएसएमटी ते पनवेल हार्बर, तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारदरम्यानच्या लोकल पाच ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, सकाळी कामानिमित्त सीएसएमटी आणि चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे.