मुंबई : मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुढील तीन- चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा – मुंबई : भूस्खलन, दरड रोखण्याचे काम अननुभवी कंत्राटदाराला! घाटकोपर दुर्घटनेनंतरही शासन बेपर्वाच

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३४.३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच आर्द्रताही ७० टक्क्यांहून अधिक होती मात्र मागील काही दिवसांपेक्षा मुंबईकरांना या दोन दिवसांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या पश्चिमेकडून वारे वाहणार असल्यामुळे मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – यंदा वाढदिवसालाच डेक्कन क्वीन रद्द, मुंबई – पुणे प्रवाशांचे हाल

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवास वेगाने सुरू आहे. मोसमी वाऱ्यांनी रविवारी बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग व्यापला आहे. दरम्यान, ‘रेमल’ चक्रीवादळाची आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला धडक बसणार आहे.