मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चांदिवलीतील माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अजित भंडारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी बुधवारी बोलवलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला विजेंद्र शिंदे उपस्थित होते. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बैठकीला काल हजर असून आज पक्ष सोडल्यामुळे शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चांदिवलीतील २०१७ चे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, तसेच विभागप्रमुख आणि मालाडमधील २०१२ मध्ये निवडून आलेले माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनीही यावेळी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. ठाण्यातील मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच प्रवेशाचा मुहूर्त साधून ठाकरे यांना सूचक इशारा दिला आहे. यावेळी ठाणे, तसेच गोव्यातील शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. गोव्यातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेसचे महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात मुंबईतील शिवसेनेतील (ठाकरे) माजी नगरसेवकांनी एक एक करत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करीत आहेत. हा ओघ असाच सुरू असून येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काठावर असलेले माजी नगरसेवक ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करीत आहेत. ठाकरे यांच्या पक्षात राहिलेल्या माजी नगरसेवकांची एक बैठक बुधवारी उद्धव ठाकरे यांनी बोलवली होती. या बैठकील विजेंद्र शिंदे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना संबोधित करताना म्हटले होते की, तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहिलात, तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी पक्षाला जय महाराष्ट्र करीत विरेंद्र शिंदे यांनी आपल्या सर्वच सहकाऱ्यांना धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावाच्या आजारपणात एकनाथ शिंदे यांनी मदत केली

विजेंद्र शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपल्या मनातील भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप खडतर काळातून जात होतो. माझ्या भावाची मोठी शस्त्रक्रिया झाली. या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सर्वतोपरी मदत केली. मी ज्या पक्षात होतो त्या पक्षातून कोणी माझी विचारपूसही करीत नव्हते. पण शिंदे यांनी आत्मीयतेने मदत केली, अशी भावना विजेंद्र शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.