मुंबई : चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की येताच शिंदे- फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव सुरू केली. ‘आम्हाला तेथे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे हे नेभळट सरकार असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी काळात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयमी भूमिका घेण्याचे आदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाकडून आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने सावध भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई या मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. त्यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर हा दौरा रद्द झालेला नसून पुढे ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता.

येत्या काही महिन्यातच कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोट, जत आदी भागांवर दावा करूनही महाराष्ट्र सरकारने मात्र मवाळ भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांचा नियोजित दौारा दुसऱ्यांदा रद्द करून शिंदे- फडणवीस सरकार कर्नाटकला शरण गेल्याचे चित्र समोर येत आहे.

महापरिनिर्वाणदिनी वाद नको – फडणवीस

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा हाणून पाडण्याकरिता कर्नाटक पोलिसांनी सीमा भागात बंदोबस्त तैतान केला होता. मंत्र्यांचा ताफा सीमेवरच अडविण्याची योजना होती. मंत्र्यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला होता. मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने टीका सुरू होताच, मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. या संदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद निर्माण करायचा का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्र्यांच्या दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील . सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटक किंवा महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. सगळा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. या संदर्भात नव्याने वाद तयार करणे योग्य होणार नाही. न्यायालयात महाराष्ट्राने ताकदीने आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नसून या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळविले आहे.

ठाकरे – पवारांची टीका

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे मंत्री कर्नाटकमध्ये जातील असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले होते. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तंबी देताच त्यांनी आपला दौरा रद्द केला. आरे ला कारे उत्तर का दिले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सीमा प्रश्नावर विरोधक काय करणार या प्रश्नावर आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ, असा टोला ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil and shambhuraj desai canceling belgaum tour summary rulers criticism of the opposition ysh
First published on: 06-12-2022 at 00:02 IST