शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य भाजपा नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना याबाबत निवेदन सादर केले. शिवाय, या प्रकरणी संपूर्ण मंत्रीमंडळाविरोधात एफआयआरची नोंद करावी व मंत्रीमंडळ बरखास्त करावं अशी देखील त्यांनी मागणी केली.

राज्यापालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”नऊ मजली इमारत अधिकृत आणि चार मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख हा दंड आणि व्याज मंत्रीमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्याविरोधी आहे. मंत्रीमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते, की आम्ही कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असं वर्तन करणार नाही. जर अशाप्रकारे अनधिकृत बांधकामांना दंड,व्याज लागलेला माफ करून त्या इमारती जर मोकळ्या करायच्या असतील, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं धोरण ठरलं पाहिजे. हा एका अर्थाने आमदार प्रताप सरनाईक यांना फायदो होण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, की ज्यामध्ये वित्त विभागाने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले आहेत. तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे, तो मंत्री होताना जी शपथ घेतलेली असते त्याचा भंग करणारा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, ”राज्यपालांना भेटण्याचा संदर्भ आहे की, राज्यपालांनी ती शपथ दिलेली असते. त्यामुळे राज्यपालांकडे आम्ही आज निवदेन सादर केलं. माझे सगळे सहकारी त्या शिष्टमंडळात होते. राज्यपालांना आम्ही आज असं सांगितलं की, तुमच्या समोर शपथ घेतलेली आहे आणि त्याचा भंग झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बरोबरीने आम्ही लोकायुक्तांची देखील वेळ मागितलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नवीन लोकायुक्त हे अजून रूजू झालेले नाहीत आणि उपलोकायुक्तांना आज सुट्टी होती. त्यामुळे सोमवारी आम्ही उपलोकायुक्तांना भेटून हे निवेदन देणार आहोत.” असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.