मुंबई : रायगडाआधी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर आता ‘राजगड’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाचा ठराव मंजूर केला. पुणे विभागीय आयुक्तांनी यावर आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर केला. या ठरावांना महसूल विभागाने मान्यता दिली १६ मार्च रोजी नामबदला संदर्भात सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर हरकती-सूचना आल्या नाहीत. त्यानुसार गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारच्या गृहविभागाने ६ मे रोजी मान्यता दिली. विशेष म्हणजे या नावाचे ऐतिहासिक महत्त्व, वेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड या नावाला केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला याच किल्ल्यावरून त्यांचे शासन केले.