मुंबईः मालमत्तेच्या वादातून धाकट्या भावावर त्याच्या मोठ्या भावाने चाकूने वार केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात घडला आहे. या हल्ल्यात सुरज (२६) गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चंद्रमोहन रामकिशोर ठाकूर (३२) याला अटक केली आहे. तात्काळ रागातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चेंबूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. तक्रारदार लगीना रामकिशोर ठाकूर यांना सूरजमोहन व चंद्रमोहन अशी दोन मुले आहेत. जून २०२५ लगीना व त्यांचे पती रामकिशोर गावावरून परतत असताना त्यांचे मोबाइल चोरीला गेले. त्या मोबाइलला रामकिशोर व त्यांचा मुलगा सूरज यांचे बँक खाते जोडण्यात आले होते. मोबाइल चोरीबाबतची माहिती चंद्रमोहनने बँकेला दिली. त्यामुळे सूरजच्या नावावरील बँक खाते बंद झाले. सूरजच्या मनात त्याबाबत राग होता.

शुक्रवारी सायंकाळी तिचा मोठा मुलगा चंद्रमोहन हा घरी चाकूने भाजी चिरत होता. त्याच दरम्यान तिचा लहान मुलगा सुरजमोहन तेथे आला. त्याने मालमत्तेवरून शिवीगाळ करुन आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी लगीना आणि चंद्रमोहनने त्याला शिवीगाळ करु नकोस अशी ताकिद दिली होती. तरीही तो त्यांना शिवीगाळ करत होता. चंद्रमोहनमुळे त्याचे बँक खाते बंद झाले आहे.

घरातील सर्व मालमत्ता त्याच्या नावावर आहे, माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही, असे बोलून त्यांच्याशी वाद घालू लागला. वारंवार समजूत घालूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे चंद्रमोहनने तुला मालमत्ता हवी आहे, असे बोलून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी त्याने सूरजच्या पोटात चाकू खुपसला. त्यात सुरज हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुगणालयात नेण्यात आले. तेथे उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची माहिती चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर लगीना ठाकूर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. चंद्रमोहन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आले. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून क्षणीक वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.