मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील दोन मोनोरेल गाड्या १९ आॅगस्टला सायंकाळी अतिगर्दीमुळे अडकल्या. यातील एका गाडीतील प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले होते. म्हैसूर काॅलनी स्थानकाजवळ कलंडलेल्या बंद गाडीचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाने प्रवाशांना बाहेर काढले नसते किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही वेळ लागला असता तर प्रवाशांच्या जीवाचा धोका वाढून अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे ही दुर्घटना अत्यंत गंभीर असताना मोनोरेलच्या संचलनाची जबाबदारी असणाऱ्या महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादीतमधील (एमएमएमओसीएल) मुख्य अभियंता (सिग्नल आणि टेलिकाॅम) तसेच व्यवस्थापक सुरक्षा हे घटनास्थळी अनुपस्थित होते. त्यांचे वर्तन बेजबाबदार असल्याचे म्हणत त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत १९ आॅगस्टला मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका हार्बर रेल्वेला बसला. परिणामी मोठ्या संख्येने प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला आणि मोनोरेल गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी चढू लागले. अशाच दोन गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक झाल्याने गाड्यांना वजन झेपले नाही आणि दोन गाड्या अडकल्या. वडाळा स्थानकानजीक अडकलेली गाडी तात्काळ दुसऱ्या गाडीने ओढून नेत त्यातील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक अडकलेली गाडी दुसऱ्या गाडीने ओढून नेण्यात एमएमएमओसीएला यश येईना. अशात बंद गाडीत प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सतर्कता दाखवत शिडी लावली आणि मोनोरेल गाडीचा दरवाजा तोडला.
तब्बल दीड ते दोन तासांनंतर एक-एक करत प्रवाशांना बाहेर काढण्यात सुरुवात झाली. अग्निशमन दलाने ५८८ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले आणि कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही. अशावेळी एमएमएमओसीएलचे व्यवस्थापक (सुरक्षा) आणि मुख्य अभियंता (सिग्नल आणि टेलिकाॅम) यांनी घटनास्थळी हजर राहत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे होते. पण हे उच्च पदस्थ अधिकारी घटनास्थळी उपस्थितच नव्हते. घटनेची माहिती मिळताच या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळणे गरजेचे होते, मात्र अधिकारी तेथे पोहचलेच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांपैकी एक अधिकारी रात्री उशिरा, सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पोहचले. तर दुसरे अधिकारी त्या दिवशी घटनास्थळी गेलेच नाहीत. ही सर्व माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्राथमिक चौकशीत समोर आली.
घटनास्थळी तातडीने हजर न राहता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत अखेर गेल्या आठवड्यात महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दोन्ही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर चार सदस्यीय समिती स्थापन करून या घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. या चौकशीनंतर दोषी अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. अत्यंत गंभीर घटना घडली असताना जबाबदार अधिकारी घटनास्थळी गैरहजर राहिल्याचे समोर आल्याने आता मुखर्जी यांनी चौकशी समितीला मोनोरेलच्या सुरक्षेबाबत नवीन मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची तरतुद करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.