मुंबई : राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे १ व २ जून रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्य व स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, राज्यातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाने आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्रात आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले जाणार आहे. राज्यात अकृषिक विद्यापीठ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र आणि तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांशी  संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.  रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळय़ामध्ये सर्वानी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. सोहळय़ासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोहळय़ाच्या दिवशी शिवभक्तांसाठी महाड ते पाचाड या दरम्यान मोफत बससेवा सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित दिल्ली, दमण दीव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा,  अमृतसर, पणजी आदी  २० ठिकाणी अभ्यास केंद्रे सुरू करण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रस्ताव आहे. बैठकीस पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार  भरत गोगावले, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.