मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना प्रवासाच्या शेवटच्या टप्यापर्यंत जाण्यासाठी (लास्ट माइल कनेक्टिव्हिटी) देण्याची गरज आहे. त्यासाठी परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत आणावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आता पाॅड टॅक्सीचा पर्याय पुढे आला असून त्याबाबतच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग आदी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीस मुखर्जी आणि भरती यांनी पाॅड टॅक्सी प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले.

कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानका दरम्यान ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर पाॅड टॅक्सीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्याचा फायदा वांद्रे- कुर्ला संकुलातील हजारो प्रवाशांना होईल. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागात नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरणार असून ही सेवा नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी एमएमआरडीने या प्रकल्पास गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्ड च्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि बांद्रा स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या.

या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची ही सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशन बाहेर असलेला स्कायवाॅक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.