लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे सोमवार राजकीय भेटींचा दिवस ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी राज ठाकरे यांची दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजते. ‘ही राजकीय भेट नव्हती. केवळ मैत्रीपूर्ण भेट होती. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज ठाकरे यांनी दूरध्वनीवरून माझे अभिनंदन केले होते व घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. यानुसार आज त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. दोघांनी न्याहारी केली,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही भेट झाल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि राज ठाकरे स्वतंत्र लढल्याचा काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला फायदा झाला होता. हे टाळण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तर राज ठाकरे यांच्या मुलाला विधान परिषदेची आमदारकी देण्याची भाजपची तयारी असल्याचेही समजते.

उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

राजकीय भेटींची चर्चा असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारण्याची संधी सोडली नाही. गणेशमूर्ती विसर्जनाचा झालेला वाद यासह विविध मुद्द्यांवर ठाकरे यांनी भाजपला फटकारले. शिवसेना शिक्षक सेनेच्या मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल चर्चा

● मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क लढविले जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दुपारी मुख्यमंत्र्यांची ‘सागर’ या निवासस्थानी भेट घेतली.

● दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने त्याला भेट द्यावी, असे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या आराखड्याविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याचेही समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या शह देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे गटाशी सूत जमल्याची चर्चा होत असतानाच, ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याने दिवसभर याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.