मुंबई : ‘मराठीचा प्रसार करणे चुकीचे नाही वा वावगेही नाही. पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल,’ असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा दिला. यावेळी त्यांनी ‘कारवाई केलीच जाईल’ यावर भर दिल्याची चर्चा आहे.

मराठीच्या मुद्द्यावर मनसेचे कार्यकर्ते बँका व केंद्रीय कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस मनसेला बळ देणार की कारवाई करणार, याबाबत उत्सुकता असताना त्यांनी नुसती कारवाई केली जाईल, असे न सांगता ‘केलीच’ जाईल, असे सांगत मनसेला इशारा दिला.

बँक संघटनेचा राज यांना सल्ला

अधिकाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रीय पातळीवर होते. त्यांना २२ मान्यताप्राप्त भाषा शिकाव्या लागतील, असे ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने राज ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. धमकावणे गैर असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकांमध्ये मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मराठी टक्का वाढविण्यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा. – देविदास तुळजापूरकर, निमंत्रक, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स